वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख क्रिस्टेलिना जॉर्जिव्हा यांनी शुक्रवारी सल्लागार समितीची घोषणा केली. यामध्ये देशाच्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचीही निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी काय निर्णय घेता येतील, याबाबत सल्लामसलत करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
रघुराम राजन हे तीन वर्षे देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. सध्या ते शिकागो विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. जॉर्जिया यांनी यावेळी म्हटले, की कोरोनाचा प्रसार होऊन आर्थिक अडथळे येण्याआधी, नाणेनिधीच्या सदस्यांनी इतरही क्लिष्ट अशा आव्हानांचा सामना केला आहे. यामध्ये आयएमएफला सहाय्य करण्यासाठी आणि योग्य ते सल्ले देण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांची समिती स्थापन करत आहोत.
या समितीमध्ये राजन यांच्यासह ११ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. यांमध्ये सिंगापूरच्या चलनविषयक प्राधिकरणाचे अध्यक्ष थरमन शन्मुगारत्नम, मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील प्राध्यापक क्रिस्टीन फोर्ब्स, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी उपमहासचिव लॉर्ड मार्क मॅलोच ब्राऊन अशा दिग्गजांचाही समावेश आहे.
हेही वाचा : 'व्हिशिंग फ्रॉड'बाबत गोवा पोलिसांचा सावधानतेचा इशारा