नवी दिल्ली - जर रोजगार कमी होवून उत्पन्न कमी झाले तर तरुणाईमधील क्रोधाचा उद्रेक होईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले. महागाई वाढत असताना भाजपने आश्वासन दिलेले हेच 'अच्छे दिन' होते, अशी टीकाही त्यांनी केली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की सीएए आणि एनपीआर विरोधात आंदोलन करण्यात देशाचे लक्ष गुंतलेले आहे. दोन्हींचे अस्तित्व स्पष्ट आणि धोकादायक आहे, असे चिदंबरम म्हणाले. ढासळती अर्थव्यवस्था हा देशाला खूप मोठा धोका असल्याचे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई वाढत असल्यानेही त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा विक्रमी निर्देशांक; गाठला ४१,९०० चा टप्पा
नरेंद्र मोदी सरकारची जूलै २०१४ मध्ये सुरुवात होताना महागाईचा निर्देशांक ७.३९ टक्के होता. तर डिसेंबर २०१९ मध्ये महागाईचा निर्देशांक ७.३५ टक्क्यांवर पोहोचला. कौशल्यहीन व्यवस्थापनाचे वर्तूळ पूर्ण झाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करा, वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव
अन्नाची महागाई ही १४.१२ टक्क्यांवर पोहोचली आहे. पालेभाज्यांच्या किमती ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्याच्या किमती प्रति किलो १०० रुपयांवरून अधिक झाल्या आहेत. याच अच्छे दिनाचे भाजपने आश्वासन दिले होते, अशी टीकाही त्यांनी केली.