मुंबई - देशात सर्वात अधिक दुचाकी उत्पादन करणारी हिरो मोटोकॉर्प कंपनीलाही वाहन उद्योगामधील मंदीचा फटका बसत आहे. कंपनी दुचाकींचे उत्पादन १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या दरम्यान बंद ठेवणार आहे.
सध्याची परिस्थिती कठीण असल्याचे संकेत हिरो मोटोकॉर्प कंपनीने दिले आहेत.
काय म्हटले आहे हिरो मोटोकॉर्प कंपनीने ?
उत्पादन बंद ठेवण्याच्या कालावधीत स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन आणि आठवडाखेरची सुट्टी आहे. तसेच अंशत: बाजारातील मागणीचाही परिणाम असल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे. उत्पादन थांबविण्याचा निर्णय हा ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच अधिक देखरेख करण्याचा हेतू असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. या निर्णयाने उत्पादनाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. त्यातून उत्पादनाचे वेळापत्रक लवचिक ठेवणे शक्य होणार आहे.
वाहन उद्योगात मंदीचे चित्र-
मागणी रोडावली असल्याने वाहन उद्योगाचे सर्वात अधिक नुकसान होत आहे. गेल्या तिमाहीपासून अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सलग नवव्या महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री घटल्याचे समोर आले आहे. त्यातून मंदी निर्माण होत आहे. टाटा मोटर्स, अशोक लिलँड आणि इतर कंपन्यांनी त्यांचे उत्पादन प्रकल्प काही दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.