नवी दिल्ली - ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या मंदीतून जात आहे. अर्थसंकल्पात सर्व वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करावा, अशी मागणी वाहन उद्योगाची संघटना एसआयएएमने केली आहे.
असुरक्षित, अधिक प्रदूषण करणारी आणि जूनी वाहने भंगारात काढण्यासाठी सरकारने सवलत देणारी योजना सुरू करावी, अशी मागणी सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजने (एसआयएएम) केली आहे. अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या अर्थसंकल्पपूर्वीय बैठकीत एसआयएएमने मागणी केली आहे.
कर कमी केल्याने वाहनांच्या किंमती कमी होतील. त्यातून ग्राहकांची मागणी वाढण्यासाठी मदत होईल,असे संघटनेने म्हटले आहे. विदेशातून आयात होणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरील (सीव्ही) आयात शुल्क २५ टक्क्यावरून ४० टक्के करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
गेल्या ११ महिन्यात वाहनांची विक्री घटली आहे. एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्री ही गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी होती. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.