नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराबाबत आढावा घेणारी जीएसटीची परिषद मंगळवारी होणार आहे. या परिषदेत स्थावर मालमत्ता क्षेत्रावरील कमी केलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने जीएसटी समितीकडून वस्तू व सेवांच्या करात कोणताही बदल होणार नाही.
२४ फेब्रुवारीला झालेल्या जीएसटीच्या बैठकीत बांधकामाधीन फ्लॅटवरील जीएसटी ५ टक्क्यापर्यंत कमी केला होता. तर परवडणाऱ्या दरातील घरांवरील जीएसटी १ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. विकसकांना कच्चा माल व सेवावर अंतिम कर किती द्यायचा आहे, याबाबत जीएसटी समितीकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
जीएसटीच्या उद्दिष्टात कपात-
फेब्रुवारीमध्ये जीएसटी महसूल ९७ हजार २४७ कोटी जमा झाला. तर जानेवारीत जीएसटी १.०२ लाख कोटी महसूल गोळा करण्यात आला होता. फेब्रुवारीपर्यंत देशात एकूण १०.७० लाख कोटींचा महसूल जमा झाला आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटींवरून ११.४७ लाख कोटी केले आहे. पुढील आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये केंद्र सरकारने जीएसटीचे १३.७१ लाख कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.