नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटाला सामोरे जाताना सरकारने तयार राहावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या घटकांसाठी सुरक्षेचे उपाय करण्यावर विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी ते सांगितले. ते पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.
स्थलतांरित मजूर, अन्न जाळे (फूड नेट) तयार करणे, गरिबांसाठी न्याय योजनेची अंमलबजावणी करणे यावर सरकारने काम करावे, असे राहुल गांधींनी सांगितले. पुढे ते म्हणाले, अन्न पुरवठा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गरिबांना रेशन देण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना १० किलो गहू, तांदूळ, १ किलो साखर आणि १ किलो डाळ दर आठवड्याला द्यायला पाहिजे. एमएमएमई आणि मोठ्या कंपन्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक पॅकेज तयार करावे, अशी त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली.
हेही वाचा-भारतीय चलनाचे विक्रमी अवमूल्यन : डॉलरच्या तुलनेत मोजावे लागणार ७६.८२ रुपये!
लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही. हा वेळ आपण वैद्यकीय पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरला पाहिजे. तसेच अर्थव्यवस्था ढासळण्यापासून सरकारने पावले टाकली पाहिजेत. कोरोनाच्या देशभरात चाचण्या घ्याव्यात, अशी त्यांनी मागणी केली. कोरोनाच्या चाचण्या हे रणनीतीचे साधन म्हणून वापरावे व कोरोनाला पराभूत करावे, असेही ते म्हणाले. सर्व देश एकत्रिपणे कोरोनाशी लढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी राज्यांना जीएसटीचा निधी उपलब्ध देण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटाला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने स्वत:च्या अधिकारात कपात करावी, अशी त्यांनी मागणी केली.
हेही वाचा-कोरोनाच्या लढ्याकरता भारताच्या उपाययोजनांना आयएमएफ करणार मदत