नवी दिल्ली – प्राप्तिकर करदात्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आर्थिक वर्ष 2018-19 साठी प्राप्तिकर परतावा भरण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. करदात्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरता येणार आहे.
कोरोना महामारीचा संसर्ग सुरू असताना प्राप्तिकर परतावा भरताना करदात्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गोष्ट लक्षात घेवून केंद्रीय प्राप्तिकर विभागाने आयटीआर भरण्याची मुदत ही दोन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर 2020 केली आहे. प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर परतावा आणि सुधारित प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविली आहे.
प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत 31 मार्चहून 30 जून केली होती. त्यानंतर पुन्हा 30 जुनवरून 31 जुलै अंतिम मुदत करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाचे उपसचिव (कर धोरण आणि कायदे विभाग) नीरज कुमार म्हणाले, की अधिसूचना ही गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून अस्तित्वात येणार आहे.