नवी दिल्ली - केंद्र सरकारने भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचे आरोप असलेल्या १५ वरिष्ठ प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. या आरोपींना केंद्र सरकारने सक्तीने निवृत्त केले आहे. केंद्र सरकारने भ्रष्ट वरिष्ठ प्राप्तिकर अधिकाऱ्यांवर केलेली ही चौथी कारवाई आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क (सीबीआयसी) विभागाकडून जीएसटी आणि आयात शुल्काचे कर संकलन करण्यात येते. या विभागातील १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती करण्यात आले आहे.
सक्तीने निवृत्त करण्यात आलेल्या निम्म्याहून अधिकाऱ्यांना सीबीआयने बेकायदेशीर भेटवस्तू घेताना पकडले होते. तर एका अधिकाऱ्याला १५ हजाराची लाच घेताना पकडले होते. एका अधिकाऱ्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आढळली होती.
यापूर्वी सरकारने कारवाई करून ४९ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सीबीडीटीच्या १२ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक प्राप्तिकरदात्यांना विनाकारण छळ करणारे आणि अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वी दिला होता.