मुंबई - कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. देशाच्या जीडीपीत जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ८.६ टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देश कोरोना महामारीतील मंदीत प्रवेश करणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
कोरोना महामारीत टाळेबंदी लागू केल्याने एप्रिल-जूनच्या तिमाहीत जीडीपीत २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर चालू आर्थिक वर्षात जीडीपीत एकूण ९.५ टक्के घसरण होईल, असा भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.
पहिल्यांदाच देश पहिल्या आर्थिक सहामाहीत मंदीत करणार प्रवेश-
आरबीआयच्या पतधोरण समिती विभागाचे पंकज कुमार यांनी आर्थिक चलवलन निर्देशांक' हा लेख लिहिला आहे. या लेखामध्ये त्यांनी भारत पहिल्यांदाच अर्धमाहीत तांत्रिकदृष्ट्या मंदीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. सलग दोन तिमाहीत विकासदरात घसरण झाल्यानंतर हा फटका बसला आहे. असे असले तरी चलनवलन हे हळूहळू पूर्ववत होईल, असेही त्यांनी लेखात म्हटले आहे. हा आर्थिक चलनवलन निर्देशांक हा दर महिन्यात असलेल्या २७ सूचकांकचा वापर केलेल्या मॉडेलवरून काढला आहे. अर्थव्यवस्था खुली होताना मे आणि जून २०२० पासून सावरत असल्याचे त्यांनी लेखात नमूद केले आहे. हा आर्थिक चलनवलन निर्देशांक हा अर्थव्यवस्थेचा विकासदर निश्चित करण्यासाठी वापरला जातो.
जागतिक बँकेने हा व्यक्त केला आहे अंदाज-
देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ९.६ टक्क्यांची घसरण होईल, असा जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना महामारीत देशभरात लागू केलेली टाळेबंदी आणि उत्पन्न कमी झाल्याचा कुटुंबांसह कंपन्यांना धक्का बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था कधी नव्हे अशी अत्यंत वाईट झाल्याचे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.