नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ३२ सुधारणांची शुक्रवारी घोषणा केली. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. अर्थमंत्र्यांच्या निर्णयामुळे उद्योगानुकलता व मागणी वाढेल तसेच कर्ज पुरवठा वाजवी दरात मिळेल, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान कार्यालयाचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केले आहे.
काय म्हटले आहे शाह यांनी ट्विटमध्ये-
भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी सुधारणा, स्टार्टअपसाठी चांगले वातावरण, जीएसटीचा परतावा त्वरित देणे आणि करासंबंधीच प्रश्न तत्काळ सोडविणे यामुळे आंत्रेप्रेन्युअरला मदत होणार आहे. त्यामुळे बाजाराची चिंता कमी होणार आहे. प्रगतीकडे नेणारी पावले उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो, असे शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जे.पी.नड्डा यांनीदेखील केले कौतुक -
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांचे भाजपचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीदेखील कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली काही महत्त्वाचे परिवर्तन करणाऱ्या सुधारणा करण्यात येणार आहेत. यातून संपत्ती निर्माण करणाऱ्यांना सुविधा, भांडवली बाजारात निधीचे प्रमाण वाढणे आणि वित्तीय बाजारपेठेसह पायाभूत क्षेत्रात उर्जा येईल, असे नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.