नवी दिल्ली – उद्योगांची संघटना फिक्कीने ‘आर्थिक दृष्टीक्षेप’ टाकणारे सर्वेक्षण जाहीर केले. यामध्ये देशाचा आर्थिक विकासदर (जीडीपी) 2020-21 मध्ये साडेचार टक्क्यांनी घसणार असल्याचे (उणे साडेचार टक्के) फिक्कीने म्हटले आहे.
कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यापूर्वी फिक्कीने देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) दर हा 5.5 टक्के राहणार असल्याचे जानेवारी 2020 मधील सर्वेक्षणात म्हटले होते. देशाचा चालू आर्थिक वर्षात विकासदर (जीडीपी) कमीत कमी साडेचार टक्के किंवा उणे 6.4 टक्के होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर हा 14.2 टक्क्यांनी घसरणार आहे. तर जास्तीत जास्त 25 टक्क्यांनी पहिल्या तिमाहीत विकासदर घसरणार आहे.
कृषी क्षेत्रातील वृद्धीदर म्हणजे चंदेरी किनार-
देशाच्या विकासदरात मोठी घसरण होत असली तरी कृषी आणि कृषीपूरक जोडधंद्यामध्ये विकासदर 2.7 टक्के होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. केवळ कृषी क्षेत्रात वृद्धीदराची चंदेरी किनार दिसणार आहे. मान्सूनची चांगली स्थिती आणि देशातील पुरेशा जलसाठ्यामुळे कृषी क्षेत्राची कामगिरी सुधारणार असल्याचे फिक्कीच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीने आणि ग्रामीण भागातील कोरोनाचे कमी प्रमाण या कारणांनी मागणीत वाढ होईल, अशी आशा फिक्कीने व्यक्त केली आहे. सध्याच्या स्थितीत जागतिक पुरवठा साखळीमध्ये विस्तार करण्यासाठी भारतापुढे संधी असल्याचे फिक्कीने म्हटले आहे. पायाभूत क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीत अधिक उदारीकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी फिक्कीने अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच देशात उद्योगानुकलूता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे फिक्कीने म्हटले आहे.