नवी दिल्ली – सलग चौथ्या महिन्यात प्रमुख आठ अशा पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. प्रमुख आठ क्षेत्रांच्या उत्पादनात जुनमध्ये 15 टक्के घसरण झाली आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, स्टील, सिमेंट आणि वीजनिर्मिती घसरण झाल्याने पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनाला फटका बसला आहे.
गतवर्षी जुनमध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचा उत्पादनात वाढ झाल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. खते वगळता सात प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. यामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने, स्टील, सिमेंट आणि वीजनिर्मितीचा समावेश आहे.
कोळशाचे उत्पादन 15.5 टक्के, खनिज तेलाचे उत्पादन 6 टक्के, नैसर्गिक वायू 12 टक्के, तेलशुद्धीकरण उत्पादने 8.9 टक्के, स्टील 33.8 टक्के, सिमेंट 6.9 टक्के आणि वीजनिर्मितीचे उत्पादनात 11 टक्के अशी घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जूनदरम्यान आठ प्रमुख क्षेत्रांचे उत्पादन हे 24.6 टक्क्यांनी घसरले आहे. तर मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते जुनदरम्यान आठ प्रमुख क्षेत्रांचे उत्पादन हे 3.4 टक्क्यांनी वाढले होते. मे महिन्यातही आठ प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनात 22 टक्क्यांची घसरण झाली होती.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकात आठ प्रमुख क्षेत्रांचा 40.27 टक्के हिस्सा आहे. आठ प्रमुख क्षेत्रांचे उत्पादन घसरल्याने देशातील औद्योगिक उत्पादनात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, टाळेबंदीचे नियम शिथील झाल्यानंतरही देशातील उद्योग अजूनही कोरोनाच्या संकटातून सावरले नाहीत. त्यामुळे आठ प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनाला चालना मिळू शकली नाही.