नवी दिल्ली - बँक घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशमधील एका व्यावसायिकावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. स्थावर मालमत्ता आणि बँकेतील रक्कम अशी एकूण साडेसात कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पोलपल्ली वेंकट प्रसाद असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
मेलिओरा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीकडे डिपॉझिट केलेले 50 लाख रुपयांसह इतर मालमत्ता ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार जप्त केली. संबधित मालमत्ता आंध्र प्रदेशातील तनुकू, पश्चिम गोदावरी जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील इंडियन ओव्हरसीज बँकेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने पीबीआर पोल्ट्री टेकचे व्यवस्थापक प्रसाद आणि इतर भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आंध्रा बँकेसोबतही गैरव्यव्हार -
पीबीआर पोल्ट्री टेकने तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढवून इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 5.60 कोटी मुदत कर्ज घेतले होते. याचबरोबर प्रसादने भागिदारांच्या नावांवर 1.74 कोटी रुपये सूक्ष्म आणि लघू उद्योगासाठी कर्ज म्हणून क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट मिळवला होता, असेही सांगण्यात येते. कर्जाची रक्कम वळवण्यात आली आणि तिची परतफेडही करण्यात आली नाही. त्यामुळे बँकेचे 7.34 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप ईडीने केला आहे. या फर्मच्या आधारावर कर्ज मिळत नसल्याने आरोपीने आणखी एक नव्या शेल फर्मची स्थापना केली. या फर्मच्या आधारावर आरोपीने आंध्र बँकेकडून कर्ज घेत, गैरव्यव्हार केला.