नवी दिल्ली - यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. मात्र, छपाईपूर्वी पंरपरेप्रमाणे होणारा हलवा उद्या समारंभ होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत.
हलवा समारंभात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम, केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर, अर्थमंत्रालयाचे सचिव आणि अर्थमंत्रालयातील अधिकारी हे उपस्थित असणार आहेत.
अर्थसंकल्पाची होणार नाही छपाई-
दरवर्षी हलवा समारंभ झाल्यानंतर अर्थसंकल्प छपाईसाठी रवाना होत असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. तसेच आर्थिक सर्वेक्षणाचीही छपाई होणार नाही. आर्थिक सर्वेक्षण हे २९ जानेवारीला संसेदत ठेवले जाणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२१: प्राप्तिकरात दिलासा मिळावा, स्टार्टअपची अपेक्षा
दोन टप्प्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन-
पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ८ मार्च ते ८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी ८ ते दुपारी दोनर्यंत लोकसभेचे कामकाज चालणार आहे. तर सायंकाळी ४ ते ९ दरम्यान शून्य प्रहर आणि प्रश्न विचारण्याचा तास असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, असेही बिर्ला यांनी आवाहन केले.
यामुळे असतो हलवा समारंभ-
प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काही दिवस अगोदर हलवा समारंभाचे आयोजन करण्यात येते. या समारंभानंतर अर्थसंकल्पासंदर्भात काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे नॉर्थ ब्लॉक इमारतीत सुमारे दहा दिवस राहतात. अर्थसंकल्पाबाबतची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात येते. अर्थसंकल्प सादर करेपर्यंत त्यांना कुटुंबाबरोबर संपर्क ठेवण्यासही परवानगी नसते. या कालावधीत त्यांना जवळच्या व्यक्तींशी फोन अथवा मोबाईल तसेच ई-मेलने संपर्क ठेवता येत नाही. केवळ अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी असते. यामागे अर्थसंकल्प गोपनीय ठेवणे हा उद्देश असतो.