नवी दिल्ली – फिच संस्थेने देशाच्या पतमानांकनाचा दर्जा कमी केला आहे. यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही ‘स्थिर’ असल्याचे फिचने पतमानांकनात म्हटले होते. त्या पतमानांकनाचे पुनरावलोकन करत भारताची अर्थव्यवस्था ‘नकारात्मक’असल्याचे फिचने म्हटले आहे.
भारताचे दीर्घमुदतीचे विदेशी चलनाचे इश्श्यूर (आयडीआर) पतमानांकन हे स्थिरवरून ‘बीबीबी’ असे नकारात्मक केल्याचे फिचने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात मार्च 2021 अखेर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 5 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज फिचने केला आहे.
देशात 25 मार्चपासून टाळेबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याने हा विकासदर घसरणार असल्याचे पतमानांकन संस्थेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी पुढील आर्थिक वर्ष 2022 पूर्वी देशाचा विकासदर 9.5 टक्के होईल, असा अंदाजही फिचने व्यक्त केला आहे. देशावरील कर्ज वाढत असल्याने आव्हाने दिसून येणार असल्याचे फिच पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
फिचपूर्वी मूडीजनेही देशाचे 'सार्वभौम पतमानांकन' हे गुंतवणुकीत सर्वात कमी दर्जाचे ‘बीएए2’ असल्याचे म्हटले होते. गेल्या 22 वर्षात देशाचे प्रथमच एवढे पतमानांकन घसरले आहे.