मुंबई - कोरोनाच्या भीतीने शेअर बाजारातील व्यवहारावर परिणाम झाला आहे. मुंबई शेअर बाजार २,७१३ अंशांनी कोसळून निर्देशांक ३१,३९०.०७ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ७५७.८० अंशांनी घसरण होवून ९,१९७ वर स्थिरावला.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे सावट शेअर बाजारावरही पडले आहे. कोविड-१९ महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी मंदावण्याची भीती आहे. या भीतीने शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २,१२५ अंशांनी घसरून ३१,९७६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ५४७.८५ अंशांनी घसरून ९,४०७.३५ वर पोहोचला.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपात केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉलरच्या तुलनेत ४१ पैशांनी घसरण होवून रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७४.१६ रुपये झाले आहे.
हेही वाचा- 'देशातील विमान वाहतुकीत १५ ते २० टक्के घसरण होईल'
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी भांडवली बाजारामधून ६ हजार २७.५८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी चढ-उतार अनुभवला होता. कोरोनाचे रुग्ण देशात आढळल्यापासून शेअर बाजाराच्या निर्देशांकात सतत घसरण होत आहे.
हेही वाचा-कोरोनाने पर्यटन क्षेत्राची दमछाक; उद्योगाची दिलासा देण्याची सरकारकडे मागणी