नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे दावोस येथील ५० व्या जागतिक आर्थिक मंचातील भारतीय प्रतिनिधींचे नेतृत्व करणार आहेत. जागतिक आर्थिक मंचाची बैठक ही २० जानेवारी ते २४ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे.
पियूष गोयल हे जागतिक आर्थिक मंचाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सहभाग घेणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री हे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, कोरिया आणि सिंगापूर या देशांशी द्विस्तरीय चर्चा करणार आहेत. गोयल हे जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालकांची भेट घेणार आहेत. तसेच आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेचे महासचिव (ओईसीडी) यांचीही भेट घेणार आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! वर्ष २०१८ मध्ये १२,९३६ बेरोजगारांच्या आत्महत्या
याचबरोबर गोयल हे विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी द्विस्तरीय चर्चा करणार आहेत. भारतीय रेल्वेत गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि जागतिक वित्तीय संस्थांनी देशात गुंतवणूक करण्यासाठी गोयल हे आर्थिक मंचात चर्चा करणार आहेत.
हेही वाचा-चालू वर्षात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता, कारण...
जागतिक आर्थिक मंचात केंद्रीय जहाजबांधणी, रसायन आणि खते मंत्री मनसुख एल. मांडवीय, कर्नाटक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, पंजाबचे अर्थमंत्री आणि तेलंगणाचे आयटी मंत्री हेदेखील उपस्थित राहणार आहेत.