नवी दिल्ली - सरकारी बँकाच्या विलिनीकरणाला विरोध करत देशातील दोन बँक कर्मचारी संघटनांनी आज संप पुकारला आहे. त्यामुळे देशातील काही ठिकाणी बँकिंग सेवेवर परिणाम झाला आहे.
बँक कर्मचारी संपावर गेले असल्याने बँक अकाउंटवरून रक्कम खात्यावर जमा करणे व पैसे खात्यावरून काढणे या सेवा विस्कळित झाल्या आहेत. तर धनादेश वटविण्याच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. सरकारी बँकांमधील अधिकाऱ्यांचा संपात समावेश नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची कामे सुरू आहेत.
एसबीआयने संप होणार असल्याची ग्राहकांना यापूर्वीच माहिती दिली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या दोन बँक कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. बँकामधील ठेवीवरील घटते व्याजदर आणि सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे.
देशामध्ये अधिक बँकिंग सेवांची गरज असताना बँकांचे विलिनीकरण चुकीचे आहे, अशी भूमिका असल्याचे एआयबीईएचे महासचिव सी. एच. व्यकंटचलम यांनी सांगितले. जनतेला सेवा देण्यासाठी अधिकाधिक बँकांच्या शाखा सुरू कराव्यात, असेही ते म्हणाले. बँकांच्या विलिनीकरणाचा परिणाम म्हणून शाखा बंद कराव्या लागणार आहेत. त्यामुळे ते चुकीचे धोरण आहे. बुडित कर्जाच्या वसुलीला बँकांचे प्राधान्य आहे. हे प्राधान्य बँकांच्या विलिनीकरणानंतर बदलणार आहे. त्यामुळे विलिनीकरणाची कल्पना चुकीची असल्याचेही व्यंकटचलम यांनी सांगितले.