नवी दिल्ली - जीएसटी कपातीच्या मागणीकरिता सर्व सदस्यांमध्ये एकी असल्याचे वाहन उद्योगांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाबाईल मॅन्युफॅक्च्युअर्सने (एसआयएएम) म्हटले आहे. वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करावा, अशी एसआयएएमची मागणी आहे.
व्यावसायिक वाहन, प्रवासी वाहन आणि त्याचबरोबर दुचाकी-तीनचाकी उत्पादकांना जीएसटीत कपात हवी, असल्याचे एसआयएएमचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की वाहन उद्योग सध्या तीव्र मंदीतून जात आहे. त्यामुळे या क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारने मदत करण्याची गरज आहे. यापूर्वी सरकारने वाहन उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून विकास हा सकारात्मक दिशेने झाला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जीएसटी कपात केल्याने ग्राहकांची मागणी वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सरकारने वाहन उद्योगाला मदत करावी, असे वढेरा यांनी म्हटले.
मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर.सी.भार्गव यांनी जीएसटीतील कपातील विरोध केल्याचे माध्यमात वृत्त आले होते. कर कपात करणे सरकारला परवडणार नसल्याचे भार्गव यांनी त्या वृत्तात म्हटले होते.