मुंबई - भारताने फेब्रुवारी महिन्यात बालाकोटमध्ये एअर स्ट्राईकची कारवाई केल्यानंतर पाकिस्ताने भारतासाठी त्यांचा हवाई मार्ग बंद केला आहे. हा हवाई मार्ग बंद झाल्यामुळे सरकारी कंपनी एअर इंडियाचे रोज १३ लाखांचे नुकसान होत आहे.
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत एअर इंडियाच्या नुकसानीबाबत लेखी उत्तरातून माहिती दिली. पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केल्याने एअर इंडियाचे रोज १३ लाखांचे नुकसान होत आहे. तर एअर इंडियाशी संलग्न असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसचे रोज २२ लाखांचे नुकसान होत असल्याचे हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत सांगितले.
हवाई मार्ग बदलला असल्याने एअर इंडियाला मार्गात बदल करावा लागला. त्यामुळे एअर इंडियाच्या खर्चात वाढ झाली. तसेच प्रवासाच्या वेळेत १५ मिनिटांची वाढ झाल्याचे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. असे असले तरी एअर इंडियाने विमान तिकिटाचे दर वाढवून प्रवाशांवर बोझा लादला नाही.
पाकिस्तानचा २६ फेब्रुवारीपासून हवाई मार्ग बंद
पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केल्याने एअर इंडियाचे रोज ६ कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र एअर इंडियाचे त्याहून कमी नुकसान झाले आहे.
पाकिस्तानने २६ फेब्रुवारीपासून हवाई मार्ग बंद केला आहे. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान प्रवासासाठी पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती. मात्र परवानगी मिळूनदेखील सुरक्षिततेचा विचार करून पंतप्रधानाचे विमान पाकिस्तानच्या हवाई मार्गामधून नेण्यात आले नव्हते.