नवी दिल्ली - देशातील २७ शहरांमध्ये भविष्यात मेट्रोची सुविधा मिळणार असल्याचे केंद्रीय शहर आणि गृहनिर्माण मंत्री दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितले. ते 'ईटीव्ही' भारतशी बोलत होते.
दुर्गा शंकर मिश्रा यांनी ईटीव्हीशी बोलताना मंत्रालयाने केलेल्या विविध कामांची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात ४०० मेट्रो लाईनचे काम करण्यात आले. तर ६५७ किमीची मेट्रो लाईन सुरू आहे. तर ८०० किमीच्या मेट्रो लाईनचे काम सुरू आहे. दिल्ली ते मीरत या मार्गावरील डिजीटल रॅपीड ट्रानस्पोर्ट व्यवस्थेच्या कामाचे भूमीपूजन झाले आहे. यामुळे दिल्ली ते मीरतदरम्यान प्रवाशांचा ४९ मिनिटे वेळ वाचणार आहे. ८२ किमीच्या मार्गावर १६ स्थानक असणार आहेत.
शहर विकास मंत्रालयाने केलेल्या कामाबाबत सांगताना त्यांनी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, २३ राज्ये ही हागणदारीमुक्त झाली आहेत. देशात ६३ लाख वैयक्तिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत. कचरा गोळा करणे आणि त्याचे वर्गीकरण करणे ही कामे गतीने होत आहेत. शहरांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी राष्ट्रीय शहर धोरण आकृतीबंध (एनयूपीएफ) तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीचा कच्चा आराखडा हा भविष्यातील शहरांचे नियोजन निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.