नवी दिल्ली - देशात रोजगार निर्मिती वाढल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये १४.३३ लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये १२.६० लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. ही आकडेवारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) दिली आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ईएसआयसीसाठी १ लाख ४९ हजार जणांनी नव्याने नोंदणी केली आहे. ही माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) अहवालात दिली आहे. तर सप्टेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान सुमारे ३.३७ कोटी जणांनी नव्याने ईएसआयसीसाठी नव्याने नोंदणी केली आहे.
हेही वाचा- केंद्रीय अर्थसंकल्प २०२० : अधिक आणि योग्य असा खर्च करा!
एनएसओची आकडेवारी ही विविध सामाजिक सुरक्षा योजनेतून घेण्यात आली आहे. त्यामध्ये ईएसआयसी, निवृत्तीवेतन निधीची संस्था ईपीएफओ आणि निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) या योजनांचा समावेश आहे. या तिन्ही संस्था नव्याने नोंदणी करणाऱ्यांची आकडेवारी एप्रिल २०१८ पासून जाहीर करत आहेत. यामध्ये सप्टेंबर २०१७ पासूनच्या आकडेवारीचा समावेश आहे.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांच्या संपाने कामकाजावर होणार परिणाम - एसबीआय
ईएसआयसीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान नव्याने ८३.३५ लाख जणांनी नोंदणी केली आहे. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१९ मध्ये ११.६२ जणांनी नव्याने नोंदणी केली आहे. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये ६.४७ लाख जणांनी नव्याने नोंदणी केली होती. अहवालात रोजगाराच्या भिन्न पातळीवरच्या आकडेवारी असल्याचे एनएसओने म्हटले आहे.