मुंबई - असहिष्णतूता आणि द्वेषातून वाढणारे गुन्हे यांचा आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होवू शकतो, असा इशारा प्रसिद्ध उद्योगपती आदि गोदरेज यांनी दिला. ते सेंट झेव्हिअर महाविद्यालयाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. देशातील बेरोजगारीचे प्रमाण हे ६.१ टक्के आहे. गेल्या ४० वर्षातील हे प्रमाण सर्वात अधिक आहे. हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढण्याची त्यांनी यावेळी गरज व्यक्त केली.
'नवा भारत' आणि ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याबद्दल आदि गोदरेज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. पुढे ते म्हणाले, देशात सर्व काही आलबेल नाही. देशात सामाजिक मुद्द्याबाबत चिंताजनक स्थिती आहे. त्याचा विकासावरही परिणाम होणार आहे.
सामाजिक अस्थिरता, वाढती असहिष्णुता, महिलांविरोधातील हिंसाचार, नैतिक पोलिसगिरी, जात आणि धर्माच्या आधारावर हिंसाचार संपूर्ण देशात वाढत असल्याचे गोदरेज यावेळी म्हणाले. यामुळे सामाजिक एकता राहू शकत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
हे प्रश्न तातडीने निकालात काढण्यात यावेत-
मोठ्य़ा प्रमाणात असलेले जलसंकट, पर्यावरणाला हानिकारक अशा प्लास्टिकचा वापर आणि अपंग करणाऱ्या वैद्यकीय सुविधा हे प्रश्न निकालात वाढावेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर आरोग्यक्षेत्रावर खर्च होण्याचे सर्वात कमी प्रमाण हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. अनेक प्रश्न हे मुलभूत पातळीवर सोडवणे आवश्यक आहे. हे जर केले नाही तर, देश क्षमतेएवढी आर्थिक प्रगती करू शकणार नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नेतृत्व करताना विद्यार्थ्यांनी लाजू नये- गोदरेज
आम्ही भीती आणि संशयाच्या स्थितीत राहत नाहीत. आम्ही जबाबदार अशा राजकीय नेतृत्वावर विश्वास ठेवतो, असे गोदरेज यांनी म्हटले आहे. नेतृत्व करताना विद्यार्थ्यांनी लाजू नये, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले. नेतृत्व हे प्रसिद्धी मिळेल अथवा नाही, याचा विचार न करता सत्याबाबत बोलत असते. विद्यार्थ्यांनी प्रेमळ, समजूतदार आणि त्याचवेळी वास्तववादी असायला हवे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
देशात गो-रक्षणाच्या नावाखाली मॉब लिचिंगचे काही गुन्हे घडले आहेत. तर धर्माच्या नावाखाली ही देशाच्या अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.