नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्ष हे रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी सौद्याचे ठरले आहे. काही सौद्यातून कंपनीकडे कोट्यवधी रुपये हस्तांरित झाले आहेत. तर मोठ्या प्रमाणात निधी कंपनीला मिळण्याच्या मार्गावर आहे. रिलायन्सला मिळणारा अतिरिक्त निधी हा सध्याच्या प्रतिकूल काळात व्यवसाय वृद्धीसाठी राखीव म्हणून ठेवण्यात येण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीजने कंपनीवरील संपूर्ण कर्ज कमी करण्यासाठी जागतिक कंपन्यांबरोबर विविध सौदे केले आहेत. हे संपूर्ण सौदे हे 2.1 लाख कोटी रुपयांचे असल्याचे कोटक इन्स्टिट्यूश्नल इक्विटीजने अहवालात म्हटले आहे.
असे आहेत रिलायन्स जिओचे सौदे
- फेसबुकने 9.99 टक्के घेतलेला हिस्सा - 43,573.62 कोटी रुपये
- 8 जागतिक कंपन्यांना 12.37 टक्के हिश्श्यांची विक्री- 60,800 कोटी रुपये
- राईट्स इश्श्यूमधून रिलायन्स इंडस्ट्रीजला 53 हजार 124 कोटी रुपये मिळणार आहेत.
- टॉलर इन्व्हआयटी आणि जेव्हीचा हिस्सा विकल्याने 70 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. या कंपनीचे 388 लाख ग्राहक आहेत. कंपनीने 2016 मध्ये मोफत कॉलिंग व स्वस्तात डाटा उपलब्ध करून दिल्यानंतर स्पर्धक कंपन्यांच्या व्यवसायात कमालीची घसरण होत गेली आहे. कंपनीकडे असलेल्या अतिरिक्त निधी हा फायबर टू होम अथवा 5 जी स्पेक्ट्रमसाठी वापरला जावू शकतो, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजवर 1.61 लाख कोटींचे कर्ज होते.