नवी दिल्ली - डिजिटल क्रांतीत किराणा दुकानदार हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी २०२३ पर्यंत ५० लाख किराणा दुकानांचे डिजिटायझेशन करणार आहे. याबाबतची माहिती बँक ऑफ अमेरिका मेर्रील लिंचच्या संशोधन अहवालात देण्यात आली आहे.
किराणा दुकानांचा मर्चंट पॉईंट ऑफ सेल (एमपीओएस) तंत्रज्ञानाकडे ओढा आहे. या तंत्रज्ञानासाठी सध्या एकावेळी किमान ५० हजार रुपये द्यावे लागतात. रिलायन्सने या क्षेत्रात प्रवेश केल्यास मर्चंट पॉईंटची किंमत कमी होईल, असे मेर्रील लिंचच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. रिलायन्सच्या मर्चंट पॉईंटची सध्या ३ हजार रुपये एवढी किंमत आहे. मर्चंट पॉईंटच्या व्यवसायात स्नॅपबिझ, नुक्कड शॉप्स आणि गोफ्रुगल या कंपन्या आहेत.
स्नॅपबिझ सॉफ्टवेअरच्या पीओएसच्या यंत्रणेची किंमत ५० हजार रुपये आहे. यामध्ये जाहिराती दाखविण्यासाठी स्क्रीन स्पेस आहे. वैयक्तिक संपर्कात राहण्यासाठी अॅप आहे. अशा यंत्रणेमुळे किरकोळ विक्रेत्यांचे मासिक उत्पन्न ८ हजार २५० रुपये वाढत असल्याचा अंदाज आहे.
पीओस यंत्रणेतून ग्राहकांना बिलातून सवलत देणे तसेच सर्व ग्राहकांना एसएमएसमधून ऑफरची माहिती एकाचवेळी देणे शक्य होते. रिलायन्स जगातील सर्वात मोठे ऑफलाईन आणि ऑनलाईन ई-कॉमर्स माध्यम तयार करत आहे. त्यासाठी किराणा दुकानांचे डिजिटायझेशन हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. रिलायन्सने देशातील १५ हजार किराणा दुकानांचे डिजिटायझेशन केले आहे.