नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजने उद्योगाच्या प्रगतीत नवा मैलाचा दगड गाठला आहे. कंपनीचे भांडवली मूल्य हे एकूण 12 लाख कोटी रुपये झाले आहे. देशात पहिल्यांदाच भारतीय कंपनीने एवढे भांडवली मूल्य मिळविले आहे. रिलायन्सच्या प्रति शेअरची किंमत 1,934.30 रुपये आहे.
मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरची किंमत 2.97 टक्क्यांनी वाढून 1,934.30 रुपये झाली आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 3.23 टक्क्यांनी वाढून 1,938.70 रुपये झाली आहे. हा रिलायन्सच्या शेअरला निफ्टीमध्ये आजपर्यंत मिळालेला सर्वाधिक भाव आहे.
शेअरची किंमत वाढल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवली मूल्य आपोआप वाढले आहे. रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 12 लाख 26 हजार 231.01 कोटी रुपये आहे. वायरलेस तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी क्वालकोम कंपनीने रिलायन्समधील छोटासा हिस्सा खरेदी केला आहे. त्यासाठी क्वालकोम कंपनीने रिलायन्सला 730 कोटी रुपये दिले आहेत.
रिलायन्समध्ये जगभरातील विविध कंपन्यांकडून गुंतवणूक होत असल्याने कंपनीला एकूण 1.18 लाख कोटी रुपये मिळणार आहेत. त्यासाठी रिलायन्सने जिओमधील 25.24 टक्के हिस्सा विकला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मूल्य असलेली कंपनी आहे. गेल्याच महिन्यात रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 11 लाख कोटी रुपये झाले होते. अद्याप, देशातील कोणत्याही कंपनीला भांडवली मूल्य हे 11 लाख कोटी रुपये मिळविणे शक्य झाले नाही.