नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीज बुधवारी वार्षिक सर्वसाधारण बैठक ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. त्यासाठी चॅटबॉटचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चॅटबॉटमधून 1 लाखांहून अधिक समभागधारकांना विविध 500 ठिकाणांहून वार्षिक सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहता येणार आहे.
मुंबईबाहेर असलेल्या रिलायन्सच्या समभागधारकांना वार्षिक सर्वसाधारण बैठकीला आजवर उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, पहिल्यांदाच समभागधारकांना जगभरातून कुठूनही ऑनलाईन प्लॅटफॉमच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित राहता येणार आहे.
व्हॉट्सअपचा वापर करून चॅटबॉटमधून समभागधारकांना बैठकीविषयी माहिती घेता येणार आहे. ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कंपनीने व्हाटसअपचा +91-79771-11111 हा क्रमांक दिला आहे. यामधून समभागधारकांना प्रश्ने विचारता येणार आहेत. तसेच ठरावावर मत देता येणार आहे. चॅटबॉटमध्ये सर्व समभागधारकांना प्रश्नांची उत्तरे देणे व मार्गदर्शन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा चॅटबॉट समभागधारकांसाठी 24x7 मदत केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. यामधून एकाचवेळी 50,000 प्रश्नांना शब्दांमधून तसेच व्हिडिओमधून उत्तरे देण्याची क्षमता आहे. त्यासाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.
एजीएमची बैठक लाईव्ह स्ट्रिम होणार आहे. त्यासाठी नवीन व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म कंपनीने तयार केले आहे. समभागधारकांना सर्व महत्त्वाचे अधिकारी आणि वक्ते दिसू शकणार आहेत. त्यांचा आवाज ऐकता येणार आहे. यावेळी समभागधारकांना प्रश्न विचारणे व ई-व्होट करणे शक्य होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मागील वार्षिक सर्वसाधारण बैठक 12 ऑगस्ट 2019 ला झाली होती. त्यावेळी चेअरमन मुकेश अंबानी यांनी 31 मार्च 2021 पूर्वी कंपनी पूर्ण कर्जमुक्त करणार असल्याचे जाहीर केले होते. या घोषणेप्रमाणे रिलायन्स कंपनी ही कर्जमुक्त झाली आहे.