नवी दिल्ली - स्पाईसजेटची पाच दिवसीय तिकीट सवलत योजना थांबविण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. देशातील विमान तिकीटांचे दर मर्यादित ठेवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) 25 मे रोजी कंपन्यांना आदेश दिले होते. या आदेशानुसार स्पाईसजेटला तिकीट योजना थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
स्पाईसजेटने 1+1 अशी पाच दिवसांसाठी तिकीट योजना जाहीर केली आहे. यामध्ये एका मार्गावरील विमान तिकीटाचा दर हा कर वगळता 899 रुपये एवढा कमी आहे. स्पाईसजेटच्या माहितीनुसार एक विमान तिकीट खरेदी केल्यानंतर ग्राहकाला 2 हजार रुपयांचे सवलत कुपन मिळणार आहे. या कुपनचा वापर करून प्रवाशांना पुढीलवेळी विमान तिकीट आरक्षित करता येणार आहे.
सरकारने विमान तिकीटाच्या दरावर मर्यादा निश्चित केली आहे, याचा उल्लेख करत डीजीसीएने स्पाईसजेटला सवलतीची योजना थांबविण्याचे आज दुपारी आदेश दिले आहेत. याबाबत स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने डीजीसीएच्या आदेशांचे पालन करण्यात येत असल्याचे सांगितले.
विमान तिकीट दरांवर सरकारचे नियंत्रण-
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 21 मे रोजी तिकीटाच्या दराची कमीत कमी व जास्तीत जास्त मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा कंपन्यांना सुरुवातीला 23 ऑगस्टपर्यंत पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर हे आदेश 24 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक संकट-
देशामध्ये 25 मेपासून विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन महिने देशात विमान वाहतूक सेवा बंद होती. तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ही 23 मार्चपासून स्थगित आहे. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे विमान वाहतूक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. विमान कंपन्यांकडून ग्राहकांची भीती दूर करण्यासाठी व विमान तिकीट विक्री वाढण्यासाठी सातत्याने योजना जाहीर करण्यात येत आहे. बहुतांश सर्व कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात व भत्त्यात कपात केली आहे. टाळेबंदी खुली झाली असली तरी 25 मेपासून विमानांमध्ये 50 ते 60 टक्केच प्रवासी क्षमता दिसून आली आहे.