नवी दिल्ली - नामाकिंत कंपन्यांचे पुड्यातून विकण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत खुद्द एफएसएसएआयनेच (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) प्रश्न उपस्थित केले आहेत. अन्न मानकाचे नियमन करणाऱ्या एफएसएसएआयने कच्च्या दुधाचे आणि काही नामांकित कंपन्यांचे प्रक्रिया केलेल्या दुधाचे काही नमुने गोळा केले. हे दूध निश्चित केलेल्या गुणवत्ता आणि सुरक्षित मानकाप्रमाणे नसल्याचे एफएसएसएआयला आढळून आले आहे.
भेसळीपेक्षा दूषित घटकांची समस्या अधिक गंभीर असल्याचे एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी सांगितले. दूषित घटकांमध्ये अॅफलॅटोक्सिन-एम१, अँटीबायोटिक्स आणि कीटकनाशकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. हे घटक दुधाच्या नमुन्यात आढळून आल्याची त्यांनी माहिती दिली.
गुणवत्तेच्या मानकांचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश एफएसएसएआयने दुग्धोत्पादन उद्योगाला दिले आहेत. चांगल्या गुणवत्तेसाठी संपूर्ण दूध पुरवठा साखळीत तपासणी आणि परीक्षणाची व्यवस्था १ जानेवारी २०२० पासून सुरू करण्याचे आदेशही एफएसएसएआयने दिले आहेत.
एफएसएसएआयने अभ्यासाकरिता ६ हजार ४३२ दुधाचे नमुने घेतले. हे नमुने मे ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान १ हजार १०३ खेडगाव आणि शहरातून घेण्यात आले आहेत. हे नमुने संघटितसह असंघटित क्षेत्रामधून गोळा करण्यात आले आहेत.