नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमधून वाहन उद्योग अजून बाहेर पडला नाही. सलग आठव्या महिन्यात मारुतीने उत्पादनात कपात केली आहे. मारुतीने सप्टेंबरमध्ये उत्पादनात १७.४८ टक्के कपात केली आहे.
मारुतीने सप्टेंबरमध्ये १ लाख ३२ हजार १९९ वाहनांचे उत्पादन घेतले. गतवर्षी सप्टेंबरमध्ये मारुतीने १ लाख ६० हजार २१९ वाहनांचे उत्पादन घेतले होते. ही माहिती मारुती सुझुकी इंडियाने शेअर बाजाराला दिली आहे. चालू वर्षात सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत १७.३७ टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची १ लाख ३० हजार २६४ वाहनांची विक्री झाली होती. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १ लाख ५७ हजार ६५९ वाहनांची विक्री झाली होती.
हेही वाचा- मंदी म्हणजे काय?, जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती
अल्टो, वॅगनॉर, सेलेरिओ, इग्नीस, स्विफ्ट, बॅलेनो आणि डिझायरच्या वाहनांचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत १४.९१ टक्के कमी झाले. वितारा ब्रेझा, इरटिगा आणि एस-क्रॉस या वाहनांचे १७.०५ टक्के कमी उत्पादन झाले. मारुती सुझुकीने ऑगस्टमध्ये वाहनाच्या उत्पादनात ३३.९९ टक्के घट केली आहे. तर टाटा मोटर्सने सप्टेंबरमध्ये ६३ टक्के उत्पादनात घट केली आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा आणि होंडानेही वाहन उत्पादनात कपात केली आहे.
हेही वाचा-टाटा नॅनोला घरघर; पहिल्या ९ महिन्यात उत्पादन ठप्प, केवळ एकाच वाहनाची विक्री