नवी दिल्ली - सरकारने आर्थिक सुधारणांची घोषणा करूनही वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम आहे. महिंद्रा अँड महिंद्राने चालू तिमाहीत ८ ते १७ दिवसापर्यंत देशातील प्रकल्प बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. विक्रीच्या तुलनेत उत्पादनाचा मेळ घालण्यासाठी प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी आणखी तीन दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवू शकते, असे महिंद्रा अँड महिंद्राने शेअर बाजाराला ९ ऑगस्टला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. चालू महिन्यात शेतीशी निगडित घेण्यात येणारे उत्पादन हे एक ते तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
उत्पादन प्रकल्प बंद ठेवल्याने बाजारामधील वाहनांच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नसल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. बाजारात मागणीप्रमाणे महिंद्राची वाहने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे महिंद्राने म्हटले आहे.
महिंद्राने जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ऑगस्टमध्ये उत्पादन प्रकल्प ८ ते १४ दिवसापर्यंत स्वयंचलित उत्पादन प्रकल्प बंद ठेवले होते.
हेही वाचा-वित्त आयोगाबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सरकारला कानमंत्र
आठवड्याच्या सुरुवातीलाच हिंदूजा ग्रुपची मालकी असलेल्या अशोक लिलँडने १६ दिवस काम बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. मागणी कमी असल्याने उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्यात येणार असल्याचे अशोक लिलँडने म्हटले होते.
हेही वाचा-सरकार झुकले..! कांदा आयात करण्याच्या नव्या निविदेत पाकिस्तानला कोलदांडा