नवी दिल्ली - ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा विविध प्रकल्पातील उत्पादन १३ दिवसापर्यंत बंद ठेवणार आहे. चालू तिमाहीदरम्यान मागणीप्रमाणे पुरवठ्याचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी कंपनीने हा आज निर्णय घेतला आहे.
महिंद्राचे उत्पादन प्रकल्प ५ ते १३ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. या कालावधीत उत्पादन घेतले जाणार नसल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
या निर्णयामुळे बाजारातील वाहनांच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नसल्याचे व्यवस्थापनाला वाटत नसल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे. कारण गरजेनुसार बाजारात वाहनांचा मुबलक साठा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात मारुती सुझुकी इंडियाने गुरगाव आणि मनेसर येथील प्रकल्पात एक दिवस उत्पादन बंद ठेवले होते. यंदा वाहनांच्या विक्री कमी होत असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्र अडचणीत सापडले आहे. मागणी कमी झाल्याने कंपन्यांना उत्पादन थांबवावे लागले आहे. एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत १७ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हे गेल्या १७ वर्षातील सर्वात कमी वाहन विक्रीचे प्रमाण आहे.
आरबीआयने गुरुवारी रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. आयएल अँड एफएसने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविल्यानंतर बिगर बँकिग वित्तीय क्षेत्रात अपुरा कर्ज पुरवठा आहे. त्याचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. दरम्यान आयआरडीएने १६ जूनपासून दुचाकींसह चारचाकीवरील विम्याच्या हप्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.