नवी दिल्ली - टाटाने टिगोर आणि हुंदाईने कॉन या इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्या आहेत. त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनेही आज इ-वेरिटोची किंमत ८० हजार रुपयांनी कमी केली आहे. जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी ७ टक्क्यांनी कपात केली आहे. त्याचा ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्राने वाहनाची किंमत कमी केली आहे.
ई-वेरिटोची किंमत ही १०.७१ लाख (ऑन रोड किंमत) असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही जीएसटीतील सवलतीचा ग्राहकांना थेट फायदा मिळवून देणार आहे. हा निर्णय त्वरित लागू होणार आहे. फेम २ च्या धोरणाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळेल, असे महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी म्हटले आहे.
महिंद्राने तीनचाकी ट्रिओची किंमतही २० हजार रुपयांनी कमी केली आहे. ट्रिओची किंमत २.०५ लाख रुपयापासून (ऑन रोड किंमत) पुढे आहे. गेल्या आठवड्यात जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक कारवरील कर हा १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जवरील कर हा १८ टक्क्यावरून थेट ५ टक्के एवढा कमी केला आहे.