बंगळुरू - कोरोनाच्या संकटाचा सेवा क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. आयटी उद्योगात यंदा नवीन नोकऱ्या नसतील, अशी शक्यता इन्फोसिसचे माजी वरिष्ठ अधिकारी टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.
आयटी उद्योगातील ९० टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. हा अविश्वसनीय आणि उल्लेखनीय बदल आयटी उद्योगाने केल्याचे इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी. व्ही. मोहनदास पै यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, ग्राहकांची वर्क फ्रॉर्म होमला परवानगी घेणे, घरातून पायाभूत सुविधा देणे व सुरक्षेची काळजी घेणे, अशा गोष्टी आयटी उद्योगाने शक्य केल्या आहेत. आयटी कंपन्यांमधील २५ ते ३० टक्के कर्मचारी हे टाळेबंदीनंतर आणि परिस्थिती पूर्वस्थिती झाली तरी घरातून काम करणार आहेत.
हेही वाचा-कोरोनाविरोधातील लढ्यात कोका कोला करणार 'इतकी' तुफानी मदत
आयटी कर्मचाऱ्यांकडून कमी होणार जागेची मागणी-
आयटी उद्योगाकडून ऑफिससाठी जागेची जास्त मागणी होईल, अशी अपेक्षा वाटत नाही. कारण कंपन्यांना सोशल डिस्टन्सिंग करण्याची गरज वाटत आहे. त्यासाठी जास्त जागा लागणार आहे. त्यामुळे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी घरातून काम केले तर कंपन्यांना २५ टक्के जास्त जागा उपलब्ध होवू शकणार आहे.
हेही वाचा-आयसीएमआरने टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने 'ही' दिली प्रतिक्रिया
नोकऱ्यांवर होणार परिणाम-
आयटी कंपन्या टाळेबंदीपूर्वी देऊ केलेल्या संधीनुसार (ऑफर) कर्मचाऱ्यांना सेवेत घेतील, असे पै यांनी सांगितले. आयटी कंपन्याचे पश्चिमेकडील देशात बाजारपेठ आहे. तेथील ग्राहकांनी अजून कार्यालये उघडली नाहीत. ते अजून चिंतेत आहेत. त्यामुळे आयटीत पुढील वर्षापासून नोकऱ्या देणे सुरू होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. आयटी कंपन्यांत कर्मचाऱ्यांना बढती मिळतील, मात्र त्याप्रमाणे बहुतांश कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना मासिक ७५ हजार ते १ लाख रुपये अथवा त्याहून अधिक वेतन आहे, त्यांचे वेतन २० ते २५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होणार नाही, अशी शक्यता मोहनदास पै यांनी व्यक्त केली.