नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला आर्थिक फटका बसत आहे. या आर्थिक संकटातून सावरण्याकरता कंपनीने दुसऱ्यांदा वरिष्ठ अधिकारी व वैमानिकांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कंपनीचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनाही बसून त्यांना 35 टक्के कमी वेतन मिळणार आहे.
इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून वेतन कपातीची माहिती दिली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की उत्पन्न कमी होत असताना खर्चाचा ताळमेळ लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला आणखी वेतनात कपात करावी लागेल, अशी मला भीती वाटत आहे. तरी पिरॅमिडच्या वरच्या भागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याचे सांगत दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील वेतन कपात ही 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तर उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन मे महिन्याप्रमाणेच असणार आहे.
अशी होणार वेतन कपात
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 टक्के
- वरिष्ठ उपाध्यक्ष -30 टक्के
- वैमानिक – 28 टक्के
- उपाध्यक्ष आणि सहाय्यक उपाध्यक्ष – 15 टक्के
कोरोना महामारीच्या संकटात इंडिगोने दुसऱ्यांदा वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेट, गोएअर आणि विस्तारासह सर्व विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. दरम्यान, देशात काही ठराविक मार्गांवरच विमान वाहतूक सेवा सुरू आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवर 23 मार्चपासून निर्बंध आहेत.