नवी दिल्ली - इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीने कर्मचाऱ्यांचे २५ टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय रद्द केला आहे. बहुतांश सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिलचे पूर्ण वेतन मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनजॉय दत्ता यांनी बदललेल्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करू नये, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे पूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे वेतन कपात करणार नसल्याचे दत्ता यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात दारू विक्री सुरू करण्यावर मद्यनिर्मिती उद्योगाची 'ही' आहे भूमिका
असे असले तरी एक्सकॉम सदस्य आणि एसव्हीपी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये कमी वेतन घेण्याचा स्वेच्छेने निर्णय घेतला आहे. तर एप्रिलचे वेतन सर्वांना कपातीशिवाय मिळणार आहे. दरम्यान, इंडिगोने १९ मार्चला वैमानिक, केबिन क्रू, सहाय्यक उपाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बँड सी आणि बँड डीमधील कर्मचाऱ्यांचे वेतन ५ ते १५ टक्के कपात करण्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा-'राज्यांची आर्थिक स्थिती प्रचंड संकटात; तातडीने मदतीची गरज'
विमान वाहतूक सल्लागार कंपनी कॅपाच्या माहितीनुसार कोरोनामुळे भारतीय वाहन उद्योगाला ३ अब्ज डॉलर ते ३.६ अब्ज डॉलरचा तोटा जूनच्या तिमाहीत सहन करावा लागणार आहे.