नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता आकर्षक योजना जाहीर केली आहे. प्रवाशाला एकट्यासाठी दोन सीट्स आरक्षित करणार आहेत. दुसऱ्या सीट्साठी पहिल्या तिकिटांहून अतिरिक्त 25 टक्के रुपये द्यावे लागणार आहेत. ही सवलत 24 जुलैपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इंडिगोने '6ई डबल सीट' नावाने तिकीट सवलत योजना जाहीर केली आहे. या तिकिटांचे आरक्षण केवळ इंडिगोच्या वेबसाईटमधून करता येणार आहे. तसेच इंडिगो कॉल सेंटर आणि विमानतळावरील काउंटरवरून तिकिट सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दुसऱ्या तिकिटासाठी विमानतळाचे अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही. केवळ जीएसटीचे शुल्क लागू होणार असल्याने तिकीट सवलतीत मिळणार असल्याचे इंडिगोने म्हटले आहे. सध्या, विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास आहे. आम्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेची भावनिक गरज समजू शकतो, असे इंडिगोचे मुख्य रणनीती आणि महसूल अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले. अतिरिक्त सीट्च्या आरक्षणासाठी सवलत योजना सुरू करावी, अशी ग्राहकांकडून मागणी करण्यात येत होती. ग्राहकांच्या सुरक्षेची खात्री देणारी नवी योजना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.
गो -एअर इंडियाकडून विलगीकरण पॅकेज
विमान प्रवास केल्यानंतर प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी काही दिवस विलगीकरणात राहावे लागते. त्यासाठी गो एअर कंपनीने ग्राहकांकरता हॉटेलात राहण्यासाठी विलगीकरण पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये ग्राहकांना प्रति रात्र 1,400 रुपयांहून अधिक भाडे असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देण्यात येते.
देशात पहिल्यांदाच विमान कंपनीने विलगीकरणाचे पॅकेज जाहीर केले आहे. या ऑफर ग्राहकांना वाडिया ग्रुपची मालकी असलेल्या गोएअर इंडिया हॉलिडे पॅकेज वेबसाईटवरून घेता येणार आहेत.