नवी दिल्ली - खासगी बँक आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यावर असलेल्या रकमेवरील व्याजदरात 25 बेसिस पाँईटने कपात केली आहे. त्यामुळे आयसीआयसीआयच्या ग्राहकांना बचत खात्यावर असलेल्या 2 कोटी रुपयापर्यंतच्या रकमेवर व्याजदर कमी मिळणार आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यावरील नवे व्याजदर हे 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. ही माहिती बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. ज्या ग्राहकांच्या बचत खात्यात 50 लाखापर्यंतच्या ठेवी आहेत, त्यांना 3.25 टक्के व्याजदर मिळणार आहे. यापूर्वी या ग्राहकांना 3.5 टक्के व्याजदर मिळत होता. तसेच 50 लाखांहून अधिक 2 कोटीपर्यंत बचत खात्यात ठेवी असणाऱ्या ग्राहकांना व्याजदर 3.75 टक्के मिळणार आहे. यापूर्वी या ग्राहकांना 4 टक्के व्याजदर मिळत होता.
हेही वाचा-छोट्या बचत योजनांबाबत केंद्र सरकारने केले 'एप्रिल फूल'; व्याजदर कमी करण्याचा आदेश मागे
नुकतेच बँकेने मुदत ठेवीसह कर्जाचे व्याजदर कमी केले होते. त्यानंतर बँकेकडून बचत खात्यावर असलेल्या ठेवीवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.
हेही वाचा-केंद्राकडून अल्पबचत योजनांमध्ये व्याजदरात 1.1 टक्क्यांपर्यंत कपात; जाणून घ्या सविस्तर माहिती
दरम्यान, केंद्र सरकारने बुधवारी अल्पबचत योजनांचे व्याजदर 1.1 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आल्याचा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश चुकून जारी करण्यात आला असून, तो लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.