नवी दिल्ली- टाळेबंदीत होंडा कारने ऑनलाईन विक्रीसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. यामध्ये डीलरशी संपर्क न करता ग्राहकांना कार खरेदी करणे शक्य होणार आहे.
होंडा कंपनीने होंडा फ्रॉम होम या उपक्रमातून ग्राहकाला हवी तशी उत्पादने व डीलर निवडण्याचा पर्याय दिला आहे. कारची बुकिंग करून देशभरातील कुठल्याही डीलरशिपमधून ग्राहकांना कार खरेदी करता येणार आहे. होंडा कारचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक (विक्री आणि विपणन) राजेश गोपाल यांनी सांगितले, की होंडा कारची ग्राहकांना घरामधूनही बुकिंग करता येणार आहे. ग्राहकांना कार खरेदी करताना डिजीटल पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-फेसबुकच्या गुंतवणुकीने रिलायन्सची वाटचाल कर्जमुक्तीच्या दिशेने...
यापूर्वीच कंपनीने देशभरातील ५०० डीलरला ऑनलाईन जोडले आहे. दरम्यान, टाळेबंदीमुळे देशभरातील दुकाने बंद आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार काही अटींवर दुकानांना विक्री करता येणार आहे. यामध्ये कंटन्टमेंट आणि रेड झोनमधील दुकानांचा समावेश नाही.
हेही वाचा-चीनच्या कोरोना किटमध्येही भारतीय कंपन्यांची नफेखोरी; कारवाईची काँग्रेसची मागणी