मुंबई – एचडीएफसी बँकेने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांकरता शौर्य केसीएजी कार्ड योजनेचे लाँचिंग केले आहे. या योजनेमधून सैनिकाला पीक उत्पादन, पीक काढणीनंतर देखभाल अशा कामांसाठी बँक कर्ज देणार आहे.
एचडीएफसी बँकेकडून कृषी यंत्र, जलसिंचन साधने आणि साठवणीच्या बांधकामासाठी सैनिकांना कर्ज देण्यात येणार आहे. एचडीएफसी बँकेकडून देण्यात येणारी कर्ज योजना ही सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आहे. त्यामधून 2 लाखांच्या सरासरी कार्डवर 10 लाखांचा विमा मिळणार आहे. त्यासाठी सैनिकाला प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज लागणार नाही. साध्या कागदपत्रातून हे कार्ड देण्यात येणार आहे.
योजनेच्या लाँचिगनंतर बोलताना एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी म्हणाले, की सैनिक व त्यांच्या कुटुंबांसाठी उत्पादन लाँच करणे हा निश्चित सन्मान आहे. त्यांच्यासाठी काही तरी करू शकतो हे पाहून मला माझे करियर सार्थकी झाल्यासारखे वाटत आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच सैन्यदलाकरता उत्पादने आहेत. आमचे संरक्षण करणाऱ्यांसाठी ही स्वातंत्र्य दिनानिमित्त भेट आहे. हा उपक्रम बँकेच्या हर गाव हमारा अभियानंतर्गत घेण्यात येणार आहे.