मुंबई - आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेसाठी मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढे आली आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या पुनर्रचित योजनेच्या आराखड्याचे मूल्यांकन सुरू असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख रजनीश कुमार यांनी आज सांगितले.
स्टेट बँकेचे अधिकारी योजनेचे मूल्यांकन करण्यासाठी परिश्रम करत असल्याचेही रजनीश कुमार यांनी माध्यंमाशी बोलताना सांगितले. रजनीश कुमार म्हणाले, की आम्हाला योजनेच्या पुनर्रचनेचा आराखडा मिळाला आहे. आमची गुंतवणूक आणि कायदेशीर टीम ही त्यावर मेहनतीने काम करत आहे. गुंतवणुकीची क्षमता असलेल्या अनेक जणांनी स्टेट बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधला आहे. गुंतवणूकदारांच्या हितात तडजोड करणार नाही.
हेही वाचा-'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारपर्यंतचीच रक्कम काढता येणार
स्टेट बँकेने येस बँकेसाठी 'पुनर्रचना योजना आराखडा २०२०' जाहीर केला आहे. यामध्ये रणनीती गुंतवणूकदार बँक ही ४९ टक्के हिस्सा घेणार आहे. या बँकेला भांडवली गुंतवणुकीनंतर किमान तीन वर्षापर्यंत २६ टक्क्यांहून कमी गुंतवणूक करता येणार नाही.
हेही वाचा-'येस बँकेत आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणा'
भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेदारांना ३ एप्रिलपर्यंत केवळ ५० हजार रुपयापर्यंत रक्कम खात्यातून काढता येते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँके बँकेवर प्रशासक म्हणून प्रशांत कुमार यांची नियुक्ती करणार आहे.