नवी दिल्ली - इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी केंद्रीय उर्जा विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या सहा महिन्यात दिल्लीसह एनसीआरमध्ये ३०० इलेक्ट्रिक चार्जिंगचे स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत.
इनर्जी इफिशयन्सेस सर्व्हिसेस लि. (ईईएसएल) कंपनीच्या संयुक्त भागीदारीतून उर्जा विभागांतर्गत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी न्यू ओख्ला इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट अॅथोरिटीबरोबर (नोएडा) सामंजस्य करार केल्याचे ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी सांगितले.
भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार असल्याने चार्जिंग स्टेशनची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दिल्लीसह एनसीआरमध्ये विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील अनेक शहरात चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी चर्चा करत असल्याची त्यांनी माहिती दिली. यापूर्वी नवी दिल्ली महापालिका समितीने डीसी -००१ १५ केडब्ल्यूचे सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ५५ ठिकाणी सुरू केले.