ग्रेटर नोएडा - कोरोना विषाणुमुळे चीनमधील अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. जर पुढील आठवड्यात चीनमधील कामगार कामावर रुजू झाले नाही. तर सर्व वाहन उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता टाटा मोटर्सने व्यक्त केली आहे. देशातील बहुतांश वाहन कंपन्यांकडून चीनमधून वाहनांच्या सुट्ट्या भांगाची आयात करण्यात येते.
टाटा मोटर्सकडून नेक्सॉन आणि इतर वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांची चीनमधून आयात करण्यात येते. टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गुएन्टर बटशेक म्हणाले, वाहन उद्योगावर मोठा परिणाम होणार नाही. पण सुट्टे भाग लवकर न मिळाल्यामुळे ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्यासाठी वेळ लागणार आहे.
हेही वाचा-आरबीआयकडून ५.१५ टक्के रेपो दर 'जैसे थे'
चीनमधील नेहमीच्या कंत्राटदारांना संपर्क करू शकत नाही. कारण ते कामावर नाहीत. त्यामुळे आम्ही अंधारात असल्यासारखी स्थिती आहे. कंपनी नेक्सॉन इव्हीच्या ऑर्डर घेत आहे. मात्र, ग्राहकांना काही दिवस त्यासाठी वाट पाहण्यासाठी कंपनीकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेले वर्षभर मंदीचा सामना करणाऱ्या वाहन उद्योगाच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-'अर्थसंकल्प २०२०' मुळे दाक्षिणात्य राज्यांचे नुकसान!