नवी दिल्ली - फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनविरोधातील तक्रारींची चौकशी करण्याचे सीसीआयने आदेश दिले आहेत. दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांकडून अनुचित व्यापार पद्धती आणि भरमसाठ सवलती दिल्या जात असल्याची तक्रार दिल्ली व्यापार महासंघाने सीसीआयकडे केली होती.
स्मार्टफोन कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्या यांच्यामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) निरीक्षण नोंदविले आहे. यामधून ई-कॉमर्स कंपन्या ठराविक विक्रेत्याची निवड करत असल्याचे सीसीआयने म्हटले आहे. भरघोस सवलती, प्राधान्यक्रमाने विक्रेत्याची करण्यात येणारी निवड आणि विशेष व्यवस्था याबाबत अधिक तपास करण्याची गरज असल्याचे सीसीआये आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा-प्रसारण वाहिन्यांना किंमती ठरविण्याची पूर्ण लवचिकता - ट्राय
काय आहे सीसीआय?
बाजारपेठेतील कंपन्यांच्या मक्तेदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) ही सरकारी संस्था कार्यरत आहे. सीसीआयकडून कंपन्यांकडून अनुचित व्यापार पद्धती रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते.
हेही वाचा-कारखानदारीला सुगीचे दिवस; साखर निर्यातीत 28 लाख टनांची वाढ
सीएआयटीने ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात वारंवार केली आहे तक्रार-
अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटीने) सातत्याने ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या सवलतींसह इतर पद्धतीवर सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. तोट्यात असलेले उद्योग फार काळ तग राहू शकत नाही, हे व्यवसायाचे मूलभूत तत्व असल्याचे सीएआयटीने म्हटले होते. गेली अनेक वर्षे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन हे तोट्यात आहेत. तरीही दोन्ही कंपन्या व्यवसाय चालू ठेवतात. एवढेच नव्हे तर दोन्ही कंपन्या दर वर्षी मोठे सेल जाहीर करतात, याविषयी सीएआयटीने गतवर्षी आश्चर्यही व्यक्त केले होते.