नवी दिल्ली - लेखापरीक्षणाची आवश्यकता असलेले प्राप्तिकर विवरण पत्र भरणाऱ्या संस्था व कंपन्यांना सीबीडीटीने दिलासा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) लेखापरीक्षणाची आवश्यकता असलेले प्राप्तिकर विवरण पत्र (आयटीआर) भरण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यापूर्वी सीबीडीटीने आयटीआर भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती.
सीबीडीटीने ट्विट करत आयटीआरच्या मुदत वाढीचा निर्णय जाहीर केला आहे. देशभरामधून मिळालेल्या प्रतिक्रियांचा विचार करून आयटीआरसाठी मुदत वाढ देण्यात आल्याचे सीबीडीटीने ट्विटमध्ये म्हटले आहे. ज्या प्राप्तिकरदात्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे. त्याबाबत लवकरच सीबीडीटी परिपत्रक काढणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात १२२ अंशाची घसरण; अमेरिकेतील राजकीय अस्थिरतेने गुंतवणूकदार चिंतेत
या कंपन्यांचे आयटीआर भरण्यापूर्वी करावे लागते लेखापरीक्षण
काही संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था प्राप्तिकर कायदा ४४ बी नुसार आयटीआर भरत असतात. त्यांना आयटीआर भरण्यापूर्वी खात्याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक असते.
दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून प्राप्तिकर विभागाचे धोरण ठरविण्यात येते.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरुच; मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८० रुपये!