नवी दिल्ली - अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा (सीएआयटी) अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधातील वाद नव्या शिगेला पोहोचला आहे. सीएआयटीने दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
ई-कॉमर्स कंपन्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सीएआयटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या किमती या बाजार प्रभावित करणाऱ्या आणि मोठ्या सवलती देणाऱ्या असतात, अशी सीएआयटीने पत्रात तक्रार केली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सीएआयटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागितली आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनसह फ्लिपकार्टच्या मोठ्या ऑफर बंद करा, अन्यथा न्यायालयात जावू'
काय म्हटले आहे सीएआयटीने पत्रात-
सरकारच्या धोरणांचे उल्लंघन करण्याची अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी दिल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. या कंपन्यांच्या उद्योग रचनेबाबत तपास होणार आहे, असा प्रश्न सीएआयटीने उपस्थित केला आहे. भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठ ही त्यांना हवी तशी खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे का? त्यातून त्यांना येथे मनमानीपणाने व्यवसाय करता येणार आहे.
तोट्यात असलेले उद्योग फार काळ तग राहू शकत नाही, हे व्यवसायाचे मूलभूत तत्व आहे. गेली अनेक वर्षे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन हे तोट्यात आहेत. तरीही दोन्ही कंपन्या व्यवसाय चालू ठेवतात. एवढेच नव्हे तर दोन्ही कंपन्या दर वर्षी मोठे सेल जाहीर करतात, याविषयी सीएआयटीने आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान अॅमेझोनला वर्ष २०१८-१९ मध्ये ७ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. तर याच कालावधीत फ्लिपकार्टला ५ हजार ४५९ कोटींचा तोटा झाला आहे.