नवी दिल्ली- जर सरकारने कोरोनाच्या उपलब्ध माहितीवरुन निर्णय घेण्यास उशीर केला असता; तर भारताला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असते, असे मत उद्योगपती गौतम अदानी यांनी अदानी इंटरप्राईजेसच्या वार्षिक अहवालात व्यक्त केले आहे.
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी म्हणाले, भारताला जगामध्ये सर्वात मोठे उपभोक्ता, उत्पादन आणि सेवांचे केंद्र (हब) निर्माण करण्याची संधी आहे. देशात स्थिर लोकशाही असलेला सरकारी कारभार आहे.
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात कोणतीही माहिती चुकीची नसते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. सरकार उपलब्ध असलेल्या माहितीवरून निर्णय घेत असते. तसेच नवीन मिळालेल्या माहितीचा स्वीकार करत असते. त्यासाठी भारत सरकार आणि प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे.
मोठी संसाधने असलेले देश हे कोरोनाच्या संकटाबरोबर संघर्ष करत आहेत. त्याच प्रमाणे आपले कोरोनाबरोबरील युद्ध संपण्यापासून आपण अद्यापही दूर आहोत, असे मत व्यक्त करत त्यांनी याकडेही लक्ष वेधले.
अदानी पुढे म्हणाले की, होय! लॉकडाऊनमुळे सध्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. काही लोकांनी आयुष्य तर काहींनी नोकऱ्या गमावल्या आहेत. संपूर्ण देशातील स्थलांतरित मजुरावरील संकट हे दुःखदायी आहे. मात्र, देशात त्यापेक्षाही अधिक मोठे संकट ओढावले असते, अशी भीतीही अदानी यांनी व्यक्त केली. इतिहास पुन्हा लिहिला जात आहे. कमी आणि मध्यम मुदतीचे काय परिणाम असू शकतील हे सांगण्याचा मार्ग नाही, हे मी कबूल करत असल्याचेही अदानी म्हणाले.
आगामी दशकांमध्ये भारताच्या बाजापेठेची प्रगती होणार आहे. मात्र, ही बाब सहज आहे असे म्हणून कुणी याकडे दुर्लक्ष करू शकत नसल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, गेल्यावर्षी भारताचा विकास दर हा गेल्या अकरा वर्षांतील नीचांकी राहिला आहे. तर कोरोना आणि टाळेबंदीमुळे देशातील अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे.