नवी दिल्ली - भारत फोर्जने टप्प्याटप्प्यात उत्पादन प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले. हे उत्पादन प्रकल्प पुण्यातील मुंढवा, चाकण आणि सातारामध्ये आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हे उत्पादन प्रकल्प बंद होते.
भारत फोर्ज लि. (बीएफएल) ही कंपनी २.४ अब्ज डॉलरचे मूल्य असलेली कल्याणी ग्रुपच्या मालकीची आहे. देशामध्ये मशीन तंत्रज्ञानामध्ये सर्वात अत्याधुनिक आणि मोठी कंपनी अशी भारत फोर्जची ओळख आहे.
बीएफएलच्या तिन्ही उत्पादन प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शारीरिक अंतर ठेवणे, आरोग्य आणि स्वच्छता यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली तर उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा-नोकर कपातीचे संकट : लाईव्ह स्पेसच्या ४५० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
प्रत्येक कर्मचाऱ्याला नोकरीत रुजू होण्यापूर्वी चांगले आरोग्य असल्याचे पत्र लिहून द्यावे लागणार आहे. तसेच आरोग्य सेतू अॅपही बंधनकारक असणार आहे. याशिवाय मास्क, वैयक्तिक उपकरणांची स्वच्छता आदी नियम कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असणार आहे. प्रत्येक फेरीनंतर बस आणि इतर कार्यालयीन वाहनांचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याचे भारत फोर्जने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना ४०० अंशांनी वधारला निर्देशांक ; 'या' कंपन्यांचे शेअर तेजीत