हैदराबाद- सामूहिक प्रतिकारक्षमता आणि लसीकरणाचे झालेले चांगले प्रमाण या कारणांना अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या युएसएफडीए या औषध नियामक संस्थेने कोणत्याही नवीन कोरोना लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या युएसएफडीए या औषध नियामक संस्थेने भारत बायोटेकची भागीदार कंपनी ओक्युजेनला बायोलिजिकल लायसन्स अॅप्लिकनेशन (बीएलए) घेऊन लशीचा मंजुरी घेण्याची शिफारस केली आहे. सर्व नवीन लस कंपन्यांना बीएलएच्या प्रक्रियेमधून जावे लागणार आहे. ही लशीच्या वापराला परवानगी मिळण्याची रीतसर पद्धत आहे. त्यामुळे बीएलएसाठी कोव्हॅक्सिनच्या अतिरिक्त वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारी युएसएफडीएला लागणार आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनला अमेरिकेत मंजुरी मिळण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा आजपर्यंतचा विक्रम; दिवसाखेर 52,641 निर्देशांक
50 हून अधिक देशांमध्ये लशीला मान्यता मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू
कोव्हॅक्सिनला युरोपियन युनियनसह 14 देशांनी लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. तर 50 हून अधिक देशांमध्ये लशीला मान्यता मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. अद्याप, भारतात विकसित झालेल्या कोणत्याही कोरोना लशीचा युरोपियन युनियनकडून लशीच्या वापरासाठी पूर्ण परवानगी मिळालेली नाही. जर ही परवानगी मिळाली तर भारतात संपूर्णपणे संशोधित केलेल्या कोव्हॅक्सिनचे मोठे यश ठरणार आहे.
हेही वाचा-टाळेबंदीचा फटका : प्रवासी वाहनांच्या विक्रीत 66 टक्के घसरण
कोव्हॅक्सिनच्या विक्रीत ओक्युजेनचा 45 टक्के हिस्सा
ओक्युजेन कंपनीने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीसाठी अमेरिकेसह कॅनडाच्या नियामक संस्थेकडे अर्ज केला आहे. ओक्युजेनचे सहसंस्थापक आणि सीईओ शंकर मुसुनुरी म्हणाले, की कोव्हॅक्सिनच्या आमच्या हक्कांमध्ये विस्तार म्हणजे भारत बायोटेकशी बळकट संबंधाचे प्रतिक आहे. आमच्या संयुक्त योगदानातून अतिरिक्त देशांना लस मिळणार आहे. कॅनडामधील कोव्हॅक्सिनच्या विक्रीत ओक्युजेनचा 45 टक्के हिस्सा असणार आहे. भारत बायोटेकचे चेअरमन कृष्णा इल्ला म्हणाले, की कोव्हॅक्सिन ही मानवी चाचणीमध्ये अत्यंत सुरक्षित असल्याचे आढळले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून जुलै ते सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी
कोरोना लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी जुलै ते सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 60 हून अधिक देशांमध्ये नियामक संस्थांकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील आणि हंगेरी या देशांचा समावेश असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.