हैदराबाद - देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना कोव्हॅक्सिन उत्पादक कंपनी भारत बायोटेकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून भारत बायोटेक लस उत्पादन वाढविणार आहे. त्यासाठी भारत बायोटेक ही दुसऱ्या कंपनीबरोबर करार करणार आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात लशीचा तुटवडा जाणवत आहे. दिल्लीस्थित पॅनासिया बायोटेक कंपनीबरोबर उत्पादन वाढविण्यासाठी कंपनी चर्चा करत असल्याचे रिपोर्टमध्ये भारत बायोटेकने म्हटले आहे. सध्या कोव्हॅक्सिनचे उत्पादन हे हैदराबादमधील जिनोम व्हॅलीमधील बायोसेफ्टी लेव्हल -3 (बीएसएल-3) मध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय भारत बायोटेककडून बंगळुरूमधील सुविधांचा वापर करून कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या बंगळुरूमधील उत्पादन प्रकल्प हा प्राण्यांच्या लशींसाठी वापरण्यात येत आहे.
हेही वाचा-कोरोनाचा फटका; 22 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील इंधनाच्या मागणीत घसरण
कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी लस-
देशात 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण सुरू असताना कोव्हॅक्सिनचा वापर करण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी असलेली कोरोना विरोधातील लस आहे. भारत बायोटेकने जानेवारीत नाकावाटे देण्यात येणाऱ्या बीबीव्ही154 ही लस विकसित सुरू असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा-मिनी टाळेबंदीने सणासुदीत होणाऱ्या वाहन विक्रीवर होणार परिणाम -इक्रा
देशात कोरोनाचा वाढता संसर्ग-
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार शनिवारच्या आकडेवारीनुसार देशात 24 तासात नवीन 1.45 लाख रुग्ण आढळले आहेत. या संसर्गानंतर देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण हे 1.32 कोटीपर्यंत पोहोचले आहे. सातच महिन्यात देशातील कोरोनाबाधितांची संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर कोरोनाने 794 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशात केवळ 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोरोनाविरोधातील लस देण्यात येत आहे. मात्र, ही लस 18 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांनाही देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.